श्रीगणेश चतुर्थी

आज गणरायाचे मोठ्या दिमाखात आगमन होत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचाच नव्हे, तर इतरही अनेक धर्मीयांच्या कुठल्याच सणाला सामाजिक रित्या साजरा करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच कोरोनाचा जागतिक पातळीवरील विळखा व त्याचा हैदोस पाहून जगभरातील लोक दिग्मूढ व हतबल झाले होते. जसजसे सामाजिक निर्बंध उठत गेले तसतसे समाजात नवचैतन्य संचारत राहून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. 
         नुकतेच राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार स्थिरस्थावर होत आहे. सत्तेवर आल्याआल्या नवीन मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे सण दणक्यात साजरे होतील याचे सूतोवाच केले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाला अपघाताचे गालबोट लागलेच. त्यात ह्या सणात सक्रीय सहभागी होणार्या गोविंदा गटांना शासकीय नोकरीत राखीव जागा ठेवल्या जातील असेही सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. हा मुद्दा वादग्रस्त प्रकारात मोडला गेला हा भाग वेगळा...
          तिकडे राष्ट्रीय पातळीवर घातपातासंबंधी चिंता वाढवणारे फोन कॉल्स परदेशातून आलेले आहेत. याच काळात कोकणात श्रीवर्धन येथील हरिहरेश्वरच्या समुद्रात बेवारस अवस्थेत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असलेली नौका आढळून आल्याने चिंतेत एकंदरीत भरच पडली आहे.
         नुकताच श्रावण मास संपल्यानंतर भारतीय सणासुदीला आता कुठे प्रारंभ झाला आहे. अशा परिस्थितीत आपले पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल, दहशतवाद विरोधी पथके तसेच इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेतच परंतु म्हणून जनतेने केवळ गाफील राहू नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षा यंत्रणा त्यांचे कर्तव्य डोळ्यांत तेल घालून करीत असते. सर्वसामान्य नागरिकांनी देखील सतर्क राहून - मला काय त्याचे- असली कूपमंडूकवृत्ती सोडून द्यायला हवी, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
           सर्वांनी अशा प्रकारची सजगता बाळगल्यास कुठल्याही अपप्रवृत्तीला डोके वर काढण्यास वाव मिळणार नाही. यामुळे आपली मनुष्यहानी व वित्तहानी टाळून हा गणेशोत्सवच नव्हे तर येणारा कुठलाही धार्मिक उत्सव हा निर्विघ्नपणे पार पडला जाईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी.
                                      - राजा सोलापूरकर 

Comments

Popular posts from this blog

बेबंदशाही

सरकार हवे कशाला?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी