" मध्य रेल्वेचा मनमानीपणा "

                     ज्या रेल्वेचा वापर करुन कसारा - खोपोली येथील लाखो नोकरदार मुंबई आणि उपनगरात आपापल्या उपजीविकेसाठी येऊन, दररोज आपल्या छातीचा खुळखुळा करुन घेऊन, अक्षरशः बजबजपुरी अनुभवत असतात आणि तरीही रेल्वेला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवून देत असतात... त्या मध्य रेल्वेची ही दारुण कहाणी!
                      सांप्रत आपण अशा शतकात वावरत आहोत, ज्या शतकाचे गुणगान आपण मागील शतकात अथकपणे अगदी कंठशोष होईस्तोवर करीत होतो. होय, एकविसाव्या शतकासंबंधी जगभरातील राहू द्या तसेच देशभरातील प्रवाशांचे देखील राहू द्या, केवळ भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विषयी, म्हणजेच ज्या महानगरीला देशाची आर्थिक राजधानी बनविण्यात ज्यांचा मोलाचा हातभार आहे अशा लोकल ट्रेनच्या सर्वसामान्य प्रवाशांविषयी बोलू या.
                        सांगावयास अत्यंत खेद होतो,की लोकल ट्रेनचे बाह्य रुपडे सोडल्यास ट्रेनच्या गती मध्ये अथवा सुखसोयींमध्ये काडीचीही प्रगती झालेली नाही. सदरील लेखक ऑक्टोबर १९८४ पासून ते आजतागायत लोकल ट्रेनचा प्रवास करीत आहे. आहे. त्या काळी देखील अंबरनाथ ते मुंबई ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (तेव्हाची व्हीटी) ह्या दरम्यानच्या जलद लोकल ट्रेनचा प्रवास एक तास पंधरा मिनिटे एवढा होता. सध्याच्या संगणक युगात देखील तोच प्रवास करण्यासाठी तितकाच अवधी लागावा, हे कशाचे द्योतक आहे? संगणक युग म्हणतात ते हेच काय?
                        मुंबईत राहणे आवाक्याबाहेरचे झाल्याने येथील सर्वसामान्य मुंबईकर, मग तो इथे भाड्याने राहणारा भाडेकरू असो वा खोलीमालक जीवावर उदार होऊन, अंबरनाथ, बदलापूर,नेरळ इतकेच नव्हे तर थेट खोपोली-कसारा येथे राहण्यास गेला. त्यांच्याकडून लाखोंचा महसूल मिळवणारी, मोठ्या कौतुकाने मुंबईची 'लाईफ लाईन' म्हणवली जाणारी उपनगरीय रेल्वे आपल्या प्रवाशांकरिता काय करते?
अनेक फलाटावर साधी प्रसाधनगृहे नाहीत,असली तरी ती कुलूपबंद असतात,उघडी असली तरी आतमध्ये पाण्याच्या नियोजनाचा अभाव! महिला प्रवाशांच्या हालअपेष्टां विषयी तर बोलूच नये अशी अवस्था... रेल्वेचा व्यवस्थापन विभाग असून नसल्यागत वागत आहे. तसे नसते तर नुकतेच कळवा व बदलापूर येथील प्रवासी आंदोलन काय दर्शविते? नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित लोकल ट्रेन रुळांवर उतरविण्याची रेल्वे व्यवस्थापनाला कोण घाई झाली आहे. प्रवाशांना अर्थात प्रवासी संघटनेला कुठल्याही प्रकारे विचारात न घेता, त्यांच्या अडीअडचणी समजून न घेता,वेळकाळ न पाहता वातानुकूलित लोकल ट्रेन प्रवाशांच्या बोकांडी बसविणे हे कुठल्या ध्येयधोरणात बसते हे ही यंत्रणा राबविणारेच जाणोत. बरे ह्या महागड्या लोकलला प्रवाशांचा तसा विरोध असण्याचे काही कारण देखील नसते परंतु आहे त्या ट्रेन रद्द करुन त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्याला प्रवाशांचा विरोध आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते या थंडगार सेवेचा लाभ घेऊ द्या पण ज्यांना हा खर्च झेपत नाही त्यांच्या गाड्या रद्द करण्यात काय हशील आहे? प्रवाशांना गृहीत धरण्याची ही वृत्ती व्यवस्थापनाला चांगलीच भोवली आहे, हे त्यांनी वातानुकूलित लोकल ट्रेन्स रद्द करुन दाखवून दिलेच आहे.
                                                    - राजा सोलापूरकर 

Comments

Popular posts from this blog

बेबंदशाही

सरकार हवे कशाला?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी