" केमिकल लोच्या "

कलकत्ता येथील प्रकरण असो वा बदलापूर येथील ताजे प्रकरण... ही प्रकरणे घडून देखील अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांचा खच दिवसेंदिवस वाढतोच आहे. कधीतरी वाचनात आले होते, की दारु पिण्याची तीव्र इच्छा ही मेंदूत होणाऱ्या रासायनिक उलाढालीतून होते म्हणे! असेलही कदाचित ... तसेच शरीरसुखाचा आनंद घेण्याची इच्छा वा इतर कुठल्याही गोष्टीचा आस्वाद घेण्याची इच्छा ही मेंदूतच तर निर्माण होते.
                    पौगंडावस्थेत मुलामुलींची अवस्था तर अतिशय अवघड असते, कारण शारीरिक व मानसिक पातळीवर केमिकल लोच्या जबरदस्त प्रमाणात उलथापालथ करत असतो. ह्या कालावधीत आईवडील आणि इतर नातेवाईक यांच्यापेक्षा मित्रमैत्रिणी खूप जवळच्या वाटत असतात. अशावेळी पाल्यांपेक्षा बिकट अवस्था पालकांची होते. पालकांना मुलांची ही घुसमट समजत असते, परंतु ती कशी हाताळायची याविषयी मात्र ते स्वतःच संभ्रमात असतात. सध्याच्या स्पर्धात्मक व संगणक युगात दररोज निघणाऱ्या नवनवीन गॅजेट्सचा कसा नि कुठवर वापर करावा,ह्यालाही काही ताळतंत्र राहिला नाही. हातातील मोबाईल काढून घेतला म्हणून आत्मघात करणारी किंवा पालकांवरच खूनी हल्ले करणारी पिढी सध्या अस्तित्वात येत आहे.

                    समाजात ज्या काही भल्याबु-या घटना घडताहेत हे पाहून मानसशास्त्रज्ञ देखील अचंबित झाले आहेत. कुटुंबसंस्था पहिल्यासारखी एकजीव राहिली नाही. व्यसनाधीनता वाढीस लागली आहे. स्पर्धात्मक युगामुळे नोकरी मिळवण्यासाठी देखील मारामार करावी लागते. लग्नाचे वय उलटून चालले आहे. घरामध्ये पूर्वी असायचे तसे संस्कारमय वातावरण राहिले नाही. एकमेकांविषयी जिव्हाळा म्हणतात तोही राहिला नाही,मग शेजारधर्माविषयी तर बोलायलाच नको.
                    मागील विधानसभा निवडणुकीत "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?",असा प्रश्न एका राजकीय पक्षाकडून सातत्याने विचारला जात होता. त्याच धर्तीवर "कुठे नेऊन ठेवली आहे,ही नवीन पिढी आपण ?" , असा प्रश्न स्वतःलाच विचारावासा वाटतोय...

                                                            --- राजू कसबे 

Comments

Popular posts from this blog

बेबंदशाही

सरकार हवे कशाला?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी