महाराष्ट्र विधानसभेचे गौडबंगाल
लोकसभा मतदानावेळी बराच गोंधळ झाला होता. उल्हासनगर येथे राहणाऱ्या मतदारांचे मतदान केंद्र कुणाचे अंबरनाथ येथे तर कुणाचे अगदी डोंबिवली येथेही आले होते. आता ह्याला संबंधित यंत्रणेची चूक म्हणावी,की मतदार ह्या झंझटमारीला वैतागून मतदान न करता सरळ घरी जाऊन बसावा आणि मतांची टक्केवारी कमी व्हावी, अशी कुठल्या राजकीय पक्षाची इच्छा असावी, काही कळायला मार्ग नाही...
प्रत्यक्षात हाती काही पुरावा नसला तरी उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रचार फेरीत तसेच प्रचार सभेत सहभागी होणाऱ्या आम जनतेचे घसे तद्वत खिसे देखील ओले केले जाताहेत म्हणे! समाजातील गरीब घटक तसेच बायाबापड्या ह्या खेळीला बळी पडत आहेत.
ही विधानसभा निवडणूक आघाडी आणि युतीसाठी केवळ प्रतिष्ठेची न राहता आता अटीतटीची देखील झाली आहे, असे म्हणावयास काहीच प्रत्यवाय नसावा. जनतेच्या माथी निव्वळ वेगवेगळी आमिषे मारण्यात कुणीही मागे नाही. लाडक्या बहिणींना, बेरोजगार तरुणांना, वृध्दांना समाजातील जवळजवळ सगळ्याच घटकांना वेगवेगळ्या आर्थिक प्रलोभनरुपी गळाला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे. आता कुणीतरी निवडून येणार हे तर खरेच, परंतु सत्तेवर आल्यानंतर एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा डोलारा उभारणार तरी कसा, हाही एक प्रश्नच आहे. आधीच आपला महाराष्ट्र कर्जात आकंठ बुडालेला असताना कुणाला अशी पैशांची खिरापत वाटणार तरी कशी आणि कुठवर?
--- राजू कसबे
Comments
Post a Comment